वसंतराव नाईक (बाबा) यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवभवानी पतसंस्था उदघाटन, नागभूमी भूषण पुरस्कार वितरण, प्रा. गणेश शिंदे यांचे व्याख्यान
वसंतराव नाईक (बाबा) यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
शिवभवानी पतसंस्था उदघाटन, नागभूमी भूषण पुरस्कार वितरण, प्रा. गणेश शिंदे यांचे व्याख्यान
शिराळा (प्रतिनिधी):
शिराळा तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व. वसंतराव नाईक (बाबा) यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त यंदाही विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे आयोजन स्व. वसंतराव नाईक बाबा स्मृती प्रतिष्ठान व परमपूज्य स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्था, शिराळा यांच्या संयुक्त विद्यमाने होत असून, समाजोपयोगी व सांस्कृतिक उपक्रमांची ही एक समृद्ध मेजवानी ठरणार आहे.
सालाबादप्रमाणे याही वर्षी नागभूमी भूषण पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, आदर्श शिक्षक व गुणवंत सेवक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
यंदाचा नागभूमी भूषण पुरस्कार शिराळा तालुक्याचे सुपुत्र, आयएफएस अधिकारी मान. राहुल पाटील यांना जाहीर झाला आहे.
तर जीवनगौरव पुरस्कार श्री. शिवाजी सिद्धू यादव यांना जाहीर झाला आहे.
त्याचबरोबर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मानही करण्यात येणार आहे.
यावर्षीच्या कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणजे शिवभवानी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, शिराळा या पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्याचाही समावेश आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासासाठी ही पतसंस्था मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे मार्गदर्शन करणार असून, खासदार मान. धैर्यशील माने (दादा), आमदार मान. सत्यजित देशमुख (भाऊ), माजी मंत्री मान. शिवाजीराव नाईक (साहेब), सांगली जिल्हा भाजपाध्यक्ष मान. सम्राट महाडिक (बाबा), शिवसेना जिल्हाप्रमुख मान. आनंदराव (बापू) पवार, महाराष्ट्र केसरी मान. पैलवान चंद्रहार पाटील, गौरव नाईकवडी यांसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲड. भगतसिंग नाईक (नाना) भूषवणार असून, उपाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक (बाबा), सचिव विश्वप्रतापसिंह नाईक (दादा) तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रमाच्या तयारीत गुंतले आहेत.
हा कार्यक्रम बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. शिवभवानी ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था, सोमवार पेठ, शिराळा येथे पार पडणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष पी. व्ही. पाटील, उपाध्यक्ष ए. एम. कुंभार व सचिव ए. एन. काझी यांनी केले आहे

