शाहुवाडी तालुक्यात आणखी एक अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडले! गेल्या दोन वर्षात तिसरी घटना….
शाहुवाडी तालुक्यात आणखी एक अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडले! गेल्या दोन वर्षात तिसरी घटना…..सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता विजयकुमार वनमोरे यांना ३८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला
शित्तूर – वारुण (शिवाजी नांगरे) शाहूवाडी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी लाच घेताना लाच लुचपतच्या जाळ्यात. प्रत्यक्ष लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर च्या पथकाने रंगेहात पकडून केली अटक. शाहूवाडी तालुक्यातील गेल्या दोन वर्षात महसूल विभाग,पोलीस विभाग आणि आत्ता सार्वजनिक बांधकाम विभाग अशा महत्वाच्या खात्यातील बडे अधिकारी आणि कर्मचारी लाचलूचपतच्या जाळ्यात अडकल्याने तालुक्यातील प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह???
याबाबत अधिक माहिती अशी कि,यातील तक्रारदार हे सार्वजनिक बांधकाम विभाग शाहूवाडी मार्फत निघणारे रस्त्याचे, पुलाचे, गटारीची कामे मुख्य ठेकेदार यांच्याकडून सबठेकेदार म्हणून करत असतात.शाहुवाडी सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेले विजयकुमार विलास वनमोरे (वय ५०) (राहणार प्लॉट नंबर २०५, संजय अपार्टमेंट, कोयना वसाहत कराड, ता. कराड जिल्हा सातारा. सध्या राहणार उकोली रोड शाहूवाडी ता. शाहूवाडी, जि -कोल्हापूर) यांना दि. १ जुलै २०२६ रोजी ३८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पथकाने रंगेहाथ पकडले व अटक केली आहे.याबाबत तक्रारदाराने कर्नाळवाडी (धनगरवाडा) ते सोनारवाडी ( विरळे) गावातील दोन किलोमीटर रस्त्याचे मुरमिकरण व खडिकरण काम सब-ठेकेदार म्हणून पूर्ण केले होते.तसेच शिराळे – वारुण येथील पूल बांधण्याचे कामही पूर्ण केले होते.या दोन्ही कामाचे बिल मंजूर करण्यासाठी शाखा अभियंता विजयकुमार वनमोरे यांनी तक्रारदाराकडे ३८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने याबाबत एसीबी, कोल्हापूरकडे तक्रार दाखल केली. पडताळणीत लाचेची मागणी निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यावेळी विजयकुमार विलास वनमोरे यांनी तक्रारदाराकडून ३८ हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
सदरची कारवाई शिरीष सरदेशपांडे पोलीस उपआयुक्त /पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे, अर्जुन भोसले अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे, यांचे मार्गदर्शना नुसार पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस उप निरीक्षक प्रकाश भंडारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप काशीद, पोलीस नाईक सचिन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल उदय पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत दावणे अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांचा सहभाग होता.
या प्रकरणी विजयकुमार विलास वनमोरे यांच्याविरुद्ध शाहुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यत सुरू होती .

