वीज ग्राहकांच्या मागण्यांसाठी आज शिराळा वीज केंद्रात विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते व वीज ग्राहकांची वीज बीलांची केली होळी
शिराळा : पाच ते सहा महिन्यापासून घरगुती वीज रीडिंग घ्यायला माणसे नाहीत, त्यामुळे ग्राहकांना भरमसाठ बिले आली आहेत. ती तातडीने कमी करुन द्यावीत व बसवलेली स्मार्ट मीटर तातडीने काढून पुर्वीची मिटर बसवावीत यासह चिखली, नाटोली व कांदे येथील वीज ग्राहकांच्या मागण्यांसाठी आज शिराळा वीज केंद्रात विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते व वीज ग्राहकांनी धडक मारली. या वेळी वाढीव आलेल्या वीज बिलांची होळी करण्यात आली. प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, तालुक्याचे माजी सभापती सम्राटसिंग नाईक, माजी उपसभापती बी. के. नायकवडी प्रमुख उपस्थित होते. उप कार्यकारी अभियंता लक्ष्मण खटावकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेनुसार तालुक्यातील प्रत्येक उपकेंद्रात जाऊन वाढीव आलेली वीज बिले दुरुस्त करून देण्यात येतील, गावातील स्थानिकांच्या समस्या सोडविण्यात येतील. तालुक्यातील वीज बिले कमी करून देणे व इतर समस्या ऐकून घेणे व कार्यवाही करणे झाल्यानंतर तहसीलदार कार्यालयात एक सामूहिक बैठक घेऊन केलेल्या कार्यवाहीची व प्रलंबित कामाबाबत माहिती देण्यासाठी कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंता, सर्व शाखा अभियंता यांच्या उपस्थितीत बैठक बोलाविणे, असे निश्चित करण्यात आहे. या सर्व गोष्टी उप कार्यकारी अभियंता श्री. खटावकर यांनी लेखी दिल्यात आहेत. प्रायोगीक तत्वावर हे तीन गावांचे आंदोलन करण्यात आले आहे. पंधरा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा विराज नाईक यांनी यावेळी दिला. यावेळी अनिल पाटील, पी. डी. पाटील, सुभाष पाटील, अशोक कुरणे, रोहित शिवजातक, छन्नुसिंह पाटील, गजानन पाटील, गोरख कुरणे, सचिन पाटील यांच्यासह चिखली, नाटोली व कांदे येथील वीज ग्राहक उपस्थित होते.

